Posts

तव तेजाचा अंश दे..

एक त्रिकाल सत्य आहे,  आपली इच्छा असो वा नसो ते स्वीकारावचं लागत ते म्हणजे प्रत्येक गोष्ट अखेरीस संपतेचं. भाऊबीजेच्या निमित्ताने दिवाळीची सांगता होत असताना ही गोष्ट जास्त प्रकर्षाने जाणवतेय. एखादया गोष्टीचा शेवट किंवा ती संपन मला कधीच आवडलेल नाहीय. फराळातील शेवटची चकली, उन्हाळी सुट्टीचा शेवटचा दिवस, पावसाळ्यातील रम्य संध्याकाळ, जवळच्या मित्रांसोबत केलेली धमाल, आवडत्या पुस्तकाचा शेवटचा धडा अखेर प्रत्येक गोष्टीचा शेवट होतोच आणि मनात उरते ती फक्त हुरहूर.. शेवटी काय काही गोष्टी आपल्या आवाक्यात नसतात. बदल हा स्वीकारावाच लागतो. पानगळ होते नवीन पालवी फुटतेच. काही गोष्टीना निरोप हा द्यावाच लागतो. हे सारं जरी खरं असलं तरी या सर्वात ऐक गोष्ट स्थिर आहे ती म्हणजे आपल्यावर नितांत प्रेम करणारी आपल्या सोबत असणारी माणसं ती कालही होती आजही आहेत आणि उद्याही असतील. आपल्याला आपण आहोत तसं स्वीकारणारी, आपल्याला समजणारी, समजावून सांगणारी माणसं आयष्यात असणं यासारखं दुसरं सुख नाही. त्यांचा सहवास चिरंतन असावा हिच ह्या दिवाळी निमित्त प्रार्थना. आपल्यावर प्रेम करणाऱ्यावर आपणही त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करूयात...